पनवेल महापालिकेचे 3991 कोटी 99 लाखाचे अंदाजपत्रक जाहीर ... विकासामुख आणि लोकाभिमुख कोणतीही दरवाढ नसलेले महापालिकेचे अंदाजपत्रक
पनवेल -: पनवेल महानगरपालिकेचे सन 2024-2025 चे 3991 कोटी 99 लाखाचे वस्तुनिष्ठ , विकासाभिमुख कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक आज (23 फेब्रुवारी) मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री.गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त केले. महापालिकेच्या या अंदाजपत्रकांमध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधाबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवरती भर देण्यात आला आहे.
यावेळी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे ,उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे,कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
महिलांच्या सशक्तीकरणावरती भर देणाऱ्या या अंदाजपत्रकामध्ये महिला व बालविकास योजनांसाठी 225 कोटी 50 लाख इतकी रक्कम अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आली आहे.
पनवेल सुकन्या योजना ....
1. मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे.
(पिवळे/केशरी रेशनकार्ड धारक)
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुलीच्या जन्मानंतर मुलींना ₹30,000/- रुपये आणि पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांच्या दोन्ही मुलींना प्रत्येकी ₹30,000/- रुपये असे एकूण एका कुटुंबास 60 हजार अतिरिक्त अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
2. युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे.
प्रति लाभार्थी युवतीस अभ्यासक्रमास येणाऱ्या खर्चापोटी प्रतिवर्ष रु.50,000/- अर्थसहाय्य देण्यात येईल. (पिवळे/केशरी रेशनकार्ड धारक)
• आरोग्य संवर्धन
1. महिलांकरिता व्यायामशाळा उभारणे.
प्रति प्रभाग समिती किमान एक सुसज्य महिला व्यायामशाळा उभारणे.
2. महिलांसाठी योगा व प्राणायामाचे प्रशिक्षण देणे.
3. मुलींसाठी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह (पिंक टॉयलेट) बांधणे व दुरुस्ती करणे.
• जाणीव जागृती
1. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी/विशेष मुलांच्या मतीमंद (वयोगट 0 वयोवर्ष -16 वयोवर्ष) उपचारासाठी व देखभाली मासिक अर्थसहाय्य करणे. (पिवळे/केशरी रेशनकार्ड धारक)
2. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण मासिक पाळी व आरोग्य विषयक जनजागृती करणे/ लेक्चर्स आयोजित करणे.
३. महिलांसाठी/मुलींसाठी समुपदेशन केंद्र/हेल्पलाइन/विधी सल्ला केंद्र चालवणे.
4. बाल कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम/lectures आयोजित करणे.
• स्वयंरोजगार
1. ऑटो रिक्षा (पिंक रिक्षा योजना) करिता प्रशिक्षण / अर्थसहाय्य देणे.
रिक्षेच्या कर्जावरील व्याजाची रक्कम महापालिकेमार्फत अदा करण्यात येईल.
• कौशल्य
1. मुलींना, महिलांना व बचत गटातील महिलांना व्यावसायिक रिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणे. MS-Office, Accounting Tally, Typing (Eng./Marathi)
2. मुलींना, महिलांना व बचत गटातील महिलांना Advance Fashion Designing प्रशिक्षण देणे.
३. असंघटित महिलांना लघुउद्योगकाचे (घरघंटी/पापड मशीन/मिरची कांडप मशीन मसाला ग्राइंडर/शेवया मशीन) प्रशिक्षण देणे.
4. व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबवणे.
उदा. संभाषण, कौशल्य, सभाधिटपणा सूत्रसंचालन इत्यादी इव्हेंट मॅनेजमेंट चे प्रशिक्षण देणे.
• क्रिडाविषयक
मुली व महिला खेळाडूंकरिता राज्यस्तर/राष्ट्रीयस्तर/आंतरराष्ट्रीय खेळासाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडू
करिता बक्षीस/शिष्यवृत्ती देणे.
• बांधकाम विभाग
महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरूस्ती काँक्रीटीकरण व डांबरीकरण व इतर सुविधांसाठी 570 कोटी रूपयांचा निधी या अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आला आहे. तसेच ‘स्वराज्य’ नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 234 कोटी व महापौर निवासस्थानासाठी 145 कोटी व नवीन प्रभाग कार्यालये यासाठी 38कोटींचा निधी शिल्लक ठेवण्यात आला आहे. प्राथमिक शाळा व माता व बालसंगोपन रुग्णालय बांधकाम 56 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
• सीसीटीव्हीसाठी व्यवस्था
महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांची सुरक्षा तसेच एकुणच सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने या अंदाजपत्रकात 165 कोटींची भरीव तरतूद पालिकेने केली. आहे.
• प्राथमिक शिक्षण होणार डिजीटल
पनवेल महापालिकेचा इंग्रजी माध्यम शाळेचा सिनीअर केजी वर्ग गतवर्षी सुरू करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून महापालिकेने पहिली ते पाचवी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने यावर्षीचे नियोजन पूर्ण झाले आहे. शहरातील दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पहिले ते पाचवी वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
तसेच बदलत्या काळाप्रमाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्येही ई लर्निंग ची सुविधा महापालिका देणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेकडून हस्तांतरीत झालेल्या शाळांचे नूतनीकरण व पुर्नबांधणी यासाठी 135 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
• वैद्यकिय सेवा
महापालिकेने मागील अर्थसंकल्प हा वैद्यकिय सेवांच्या बळकटीकरणावर भर देणारा बनविला होता. त्याप्रमाणे पालिकेने 14 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व 5 आरोग्यवर्धिनी केंद्रांची उभारणी ,1 आपला दवाखान्याची उभारणी केली आहे. यावर्षी देखील महापालिकेने वैद्यकिय सेवा व आरोग्य विषयक कार्यक्रम व अकस्मित कारणांसाठी 98 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
• पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा ..
पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 141 कोटी व शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत 145 कोटी व स्वच्छ भारत योजना अंतर्गत 18 कोटी रूपयांचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. बाग व उद्याने यांच्या विकासाकरिता 110 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रिडांगणांच्या विकासासाठी 21 कोटींची भरीव रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
• झोपडपट्ट्याचा पुर्नविकास ....
शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे या हेतुने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकासाठी 200 कोटीचा भरीव निधीची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.
• घनकचरा संकलन .....
शहर सुशोभिकरणाबरोबरच घनकचरा संकलन व त्यासाठी लागणारी सामुग्री, वाहने , मनुष्यबळ यासाठी 149 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. भुयारी गटार व मलनिस्सारण विभागासाठी 172 कोटींची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
आरोग्य ,शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते अशा गुणवत्तापूर्ण पायाभूत सोयीसुविधा बरोबरच शहर सुशोभिकरण, झोपडपट्टी पुर्नविकास अशा महत्वाच्या गोष्टीचांही या अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात आल्या असून नागरिकांच्या गरजा ओळखून विकासामुख आणि लोकाभिमुख कोणतीही दरवाढ नसलेले असे पालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
Post a Comment