कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी ......मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड (जिमाका)- शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले आहेत. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २४ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच, माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंड येथे जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठ लोणोरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कुलगुरु प्रा.डॉ. कारभारी काळे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्ताना घराच्या चाव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच पनवेल महापालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तातरण प्रणालीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबीर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय जय श्री राम!' अशी घोषणा देवून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार पुढे नेत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. 'शासन आपल्या दारी’ हा छत्रपती शिवरायांना आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे. सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत नाहीत. सरकार जनतेच्या दारात येऊन त्यांची कामं करतंय.
आजचा हा शासन आपल्या दारीचा २० वा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. कोकणची भरभराट झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील आहोत. बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मोदी है तो मुनकीन है..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जनतेला विकासाची गॅरण्टी दिलेली आहे. ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकासाचा विजय आपण पाहिला आहे. महाराष्ट्रालादेखील पाठबळ दिले आहे. २२ तारखेला अयोध्येत राम मंदिराची उभारणी होतेय. बाळासाहेबांचे स्वप्न साकार होतेय. काही लोकांनी राम अस्तित्वात होता की नाही अशी शंका घेतली होती. काहीजणांनी, 'मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे' अशी खिल्ली उडवली होती. पण, मंदिरही झालं आणि तारीखही सांगितली. मोदी है तो मुमकीन है..असे मुख्यमंत्री म्हणाले.'निर्णय वेगवान गतिमान सरकार' अशा पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करु, असेही ते म्हणाले.
रायगड सुशासनाची राजधानी
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांना मानवंदना अर्पित करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगड ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य स्थैर्य आणि सामर्थ्य या त्रिसुत्रीचा मूलमंत्र मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून रायगडकडे आपण पाहतो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, प्रजेकरिता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेच्या सेवेसाठी प्रशासन हाच भाव ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत. त्याचं निर्धाराने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत आहेत.
कमी कालावधीत जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटिपेक्षा जास्त लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे. लाभाकरता एकाही लाभार्थ्यांला चक्कर मारावी लागली नाही. थेट दारामध्ये लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. गेली 50 वर्षे महाराष्ट्राचा विकास मुंबईमुळे झाला, तर, पुढची 25 वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे.डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा करतोय. मोठ्याप्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पहायला मिळणार आहे. रायगडचे चित्र आपण कामातून बदलतोय. सामान्य माणसाचा विचार आम्ही सुरु केला. १ रुपयत विमा, नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ६ हजार मदत अशा अनेक योजना सुरु केल्या.
देशाला पुढे न्यायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे,असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचे सक्षमीकरण करतोय. असेही ते म्हणाले.
कोकणाच्या विकासासाठी निधी
कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
जोपर्यंत जनता आमच्या पाठिशी आहे तो पर्यंत कोकणाचा सर्वांगिण विकास थांबणार नाही.त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला 'शासन आपल्या दारी' महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे.आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्या भूमितून मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले अशा ठिकाणी होत आहे. याचा मला अभिमान आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते, त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायची, मात्र आता 'शासन आपल्या दारी'तून घरघरापर्यंत योजना पोहचत आहेत. सर्वसामान्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचे, पुढे आणण्याचे, आर्थिक संपन्नता देण्याचे काम शासन आपल्या दारीतून सुरु आहे. या योजनेद्वारे समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ होत आहे.
कोकणातील स्थानिकांना मार्गदर्शन करताना श्री. पवार म्हणाले, रायगड जिल्हा हा निसर्गसमृद्ध जिल्हा आहे. या ठिकाणी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यामुळे स्थनिकांनी आपल्या जमिनी विकू नका राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी पर्यटनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. कोकणाच्या सर्वांगीण विकासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
या भागात तिसरी मुंबई तयार होत आहे.त्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोकणाच्या किनारपट्टीवर जेट्टीचे जाळे उभारण्यात येत आहे. रो रो सेवा वाढविण्यात येत आहे. या भागात पिकणाऱ्या फळांना मोठ्यप्रमाणावर बाजारपेठा मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही पवार म्हणाले.
स्वागतपर भाषणात पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन ३ महिन्यात करु शकलो, ही गतिमानता शासनाची आहे. अतिशय गतिमान पध्दतीने शासन काम करीत आहे. जनतेला असाच दिलासा दिला जाईल असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डाॕ योगेश म्हसे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ भरत बास्टेवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
Post a Comment