दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या तरुणीचा खाली पडून मृत्यू : तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा ... तळोजा परिसरातील घटना
पनवेल : भरधाव दुचाकी चालवल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील तळोजा परिसरात घडली आहे.त्यामुळे तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरून मृत तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव शैफिता मुस्ताक खान (२३) असे असून ती कल्याण पलावा येथील मारवेला सोसायटीत कुटुंबासह राहात होती. शैफिता ही चेंबूर येथील आयटी कंपनीत काम करत होती. रात्रीच्या सुमारास शैफिता ही मित्र सुफियान सलीम कुरेशी (२८) याच्यासोबत त्याच्या मोटारसायकलवरून घरी परतत होती. यावेळी त्यांची मोटारसायकल तळोजा एमआयडीसीतील नावडे फाटा कल्याण रस्त्यावरील महानगर गॅस पंपाजवळ आली असताना, शैफिताचा तोल गेल्याने ती दुचाकीवरून खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत होऊन ती जबर जखमी झाल्याने सुफियान याने तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले.मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Post a Comment