दुकांनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना पनवेल महापालिकेकडून नोटीसा : चारही प्रभागात ११६३ दुकांनाना नोटीसा बजावल्या
पनवेल : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ 'क' नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे आदि प्रकारच्या प्रत्येक आस्थापनेचा,दुकानाचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील चारही प्रभागांमधील मराठी नामफलक नसलेल्या ११६३ दुकाने व आस्थापानांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रभागात स्पीकरद्वारे अनाउन्समेंट देखील केली जात आहे.
ज्या आस्थापनांनी अजूनही अमराठी पाट्या बदलल्या नाहीत अशा आस्थापनांचा प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरु असून सदर आस्थापनांना महापालिकेकडून कारवाईच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. गेल्या शनिवारपासुन नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून प्रभाग अ, ब, क ड मधील सुमारे 1163 दुकाने तसेच आस्थानांना आत्तापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत आवश्यकती कार्यवाही करण्याकरीता शुक्रवारी (दि.२४ नोव्हेंबर) उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजीत व अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहीलेली जरी असली तरीही ती औपचारीकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहीलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक हे ठळक मराठी (देवनागरी) लिपीत तर असावाच त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार दि.२५ नोव्हेंबर पर्यंत दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून यापुढेही नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे.
महापालिकेच्या नोटीसांचा प्रभाव .....
महापालिकेने गेल्या दोन-तीन दिवसापासून मराठी(देवनागरी) भाषेत नामफलक नसलेल्या दुकानांना व आस्थापनांना नोटीस दिल्यानंतर खारघर, कामोठे, कळंबोली,पनवेल चारही प्रभागांमध्ये बहुतांशी दुकानांनी आपले नामफलक बदलेले दिसून येत आहे.
Post a Comment