स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेलच्या मोहल्ला चौकात प्रथमच ध्वजारोहण : देशाचे माजी सैनिक,वरिष्ठ पोलीस अधिकारी,नागरिक यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा
पनवेल- माजी नगराध्यक्ष व सिटीझन वेल्फेअरचे अध्यक्ष सईद मुल्ला यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेलच्या मोहल्ला नाक्यावर प्रथमच देशाचे माजी सैनिक,वरिष्ठ पोलीस अधिकारी,नागरिक यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला,यावेळी देशाचे माजी सैनिक समीर दुंदरेकर व सचिन कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण देशभर जाईल अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
मोहल्यातील मौलाना आझाद चौकात सिटीझन वेल्फेअरतर्फे मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यापूर्वी या परिसरात अस्वच्छता होती. माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ केला, महानगरपालिकेचे सहकार्य घेतले,स्वच्छतेबाबत जनजागृती करून सातत्य ठेवल्याने आज या परिसराचा कायापालट झाला आहे. या चौकातच आज मोठ्या उत्साह आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
यावेळी माजी सैनिक समीर दुंदरेकर यांनी, हा माझ्यासाठी मोठा योग आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. देश आहे तर आपण आहोत,हे नवीन पिढीच्या लक्षात आणले पाहिजे. देशसेवा केली पाहिजे.नवीन पिढीला याची जाणीव करून दिली पाहिजे. नवीन पिढी देशाचे भविष्य आहे, तेच देशाचे नाव पुढे करतील असे सांगितले. पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी,समाजात सकारात्मकता-एकात्मता निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी येऊ आणि हा कार्यक्रम आणखीन कसा मोठ्या स्वरूपात होईल असे सांगून अशा सकारात्मक कार्यक्रम देशभर जाईल.एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम असून समाजकंटकांना मोठी चपराक आहे,त्यांना यातून उत्तर दिले आहे. माजी नगराध्यक्ष शहीद मुल्ला यांनी आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा सर्वांच्या सहकार्याने होत आहे हा कार्यक्रम असाच यापुढेही कायमस्वरूपी करण्यात येईल असे सांगून मोहल्ला परिसरात स्वच्छता केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी,या कार्यक्रमातून समाजात एक चांगला संदेश जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमास समाजसेवक नाझीम नालखांडे, माजी नगरसेवक आवेस मस्ते तसेच जावेद पटेल, असलम युसुफ पठाण, जहूर सॅन,लतीफ पटेल, अतिफ मस्ते,सिटीझन वेल्फरचे उपाध्यक्ष शोएब कच्छी तसेच अनिल कथारे,माजी नगरसेविका जैनब शेख,मायनॉरिटी उर्दू स्कूलचे चेअरमन अ.हमीद धुरु तसेच वहाब जनाब,आदम मास्टर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ मुल्ला यांनी केले.
Post a Comment