कचऱ्याची दुर्गंधी असह्य झाल्याने नवीन पनवेलमध्ये कचरा डेपो विरोधात नागरिक रस्त्यावर : पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित
पनवेल - कचऱ्याची दुर्गंधी असह्य झाल्याने नवीन पनवेलमध्ये कचरा डेपो विरोधात नागरिकांनी गाड्या अडवून आंदोलन केले.पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
नवीन पनवेल सेक्टर १ येथे सिडकोचे गाड्या दुरुस्ती आणि सर्विस सेंटरसाठी नियोजित भूखंड आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडकोकडून महानगरपालिका हद्दीतील कचरा गोळा करण्याची हस्तांतरित करण्यात आली. ज्यामध्ये नियोजनाअभावी सर्विस सेंटरच्या जागेवर संपूर्ण परिसरातील कचरा गोळा केला जात होता. त्यानंतर तो मोठ्या गाड्यांमधून घोट कॅम्प येथील कचरा डेपोमध्ये पाठविला जात होता. सदर प्रक्रिया दरम्यान त्या ठिकाणी चोवीस तास कचरा साठवण होत होती याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्यावर पनवेल महानगरपालिकेकडून सतत सांगण्यात येत होते की,सिडकोने सदर प्रक्रियेसाठी भूखंड उपलब्ध करून दिल्यानंतर ते केंद्र हटविले जाईल. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी,पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडे लेखी स्वरूपात गेली काही महिने पाठपुरावा केलेला आहे. 23 मे रोजी सिडकोला सदर विषयात त्वरित निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे त्यांनी सांगितले आहे.
परिसरातील नागरिकांनी कचऱ्याची दुर्गंधी असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबांसमवेत रस्त्यावर उतरून तेथे येणाऱ्या घंटागाड्या अडवल्या.जोपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून योग्य निर्णय येत नाही तोपर्यंत गाड्या सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आल्यानंतर त्यांनी सदर विषय समजून घेतला त्यानंतर सदर भूखंडावर भरलेल्या गाड्या न टाकण्याचे कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला निर्देश दिले जर त्या ठिकाणी पुन्हा भरलेल्या गाड्या खाली केल्या तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारे योग्य ती मध्यस्थी केल्यामुळे तात्पुरते नागरिकांना मार्फत घेतले गेलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले.यावेळी शेकाप नेते प्रभाकर कांबळे, मंगेश अपराज, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री योगेश तांडेल, शिवसेना महिला आघाडी संघटक सौ अपूर्वा प्रभू, समाजसेविका चित्रा देशमुख यांनी नागरिकांची बाजू पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे प्रकर्षाने मांडली.
सदरच्या कचरा प्रकरणी गेली काही महिने मी पाठपुरावा करत आहे परंतु फक्त कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे सिडको आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाने काहीही केलेले नाही. मी 23 मे रोजी पुन्हा पत्र सिडकोला दिले आहे. जर कचरा डेपो बंद नाही झाला तर तो आम्ही बंद करूनच राहू. यासाठी आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत:
- प्रितम म्हात्रे (मा.विरोधी पक्षनेते, प. म. पा.)
Post a Comment