News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रायगड जिल्ह्यात तापमानात वाढ होणार

रायगड जिल्ह्यात तापमानात वाढ होणार

अलिबाग, :-  प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान विषयक पूर्व सूचनेमध्ये जिल्ह्यात दि.१४ मार्च ते १६ मार्च २०२२ या कालावधीत तापमानात वाढ होणार असून या तीन दिवसात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   
     
 उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे आहेत.  
         ही लक्षणे आढळल्यास उपचार म्हणून रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे. कुलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईसपॅड लावावेत.आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने शिरेवाटे सलाईन देणे आदी गोष्टी कराव्यात. 

         उष्माघातामध्ये तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री- टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा.  प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.  उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तीने डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.   
         अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   

         गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.  जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी.

           उष्माघाताच्या लाटेत लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.  दुपारी 12.00 ते 3.30 कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
          संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने या सूचना जारी केल्या असून त्याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment