नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पनवेलमध्ये भूमीपुत्र निर्धार परिषद.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला
दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी
पनवेलमध्ये भूमीपुत्र निर्धार परिषद....
पनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंती निमित्ताने 13 जानेवारीला रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील भूमीपुत्र निर्धार परिषद होत आहे. आतापर्यंत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने सारा भूमीपुत्र समाज एकवटला. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या भूमीपुत्रांची ताकद संपूर्ण भारताने पाहिली. येत्या 13 जानेवारी 2022 रोजी विमानतळ परिसरातच म्हणजेच पनवेल जवळील कोल्ही-कोपर गाव येथील दत्त मंदिराजवळ ही भूमीपुत्र निर्धार परिषद दुपारी 3 वाजता होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठीचा लढ्यात विविध जिल्ह्यांतील भूमीपुत्र सहभागी झाले. भूमीपुत्र जिथे राहतात तेथे वेगवेगळे संघर्ष आज उभे आहे. त्यांच्या या संघर्षामध्येे त्यांना सोबत करणे, त्यांच्या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधून घेणे ही सुध्दा लढ्याची जबाबदारी आहे. याच भावनेतून येत्या 13 जानेवारीला ही भूमीपुत्र परिषद होत आहे.
ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणार्या अन्यायाची जाणीव करून देणारी आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठी आहे.
या परिषदेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या संबंधित सर्व विषयांची उजळणी होणार आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला अल्टीमेटम देण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून येणार्या संघर्षाची ही नांदी ठरणार आहे.
या परिषदेस केंद्रीय मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार विविध पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक उपस्थित राहणार असल्याचे समजते.
Post a Comment