राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना शुभेच्छा आणि समस्यांचे निवेदन ....महानगरातील रस्त्यांची दुरावस्था,क्रीडांगणांचा अभाव,सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था,माता बाल संगोपन केंद्र,कळंबोली येथे रुग्णालय याचबरोबर आदी समस्यांबाबत जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांचे निवेदन
पनवेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त मंगेश चितळे यांना शुभेच्छा दिल्या आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील समस्या संदर्भात निवेदन दिले.
जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात,पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळपास आठ वर्ष होत आले आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोकडून महापालिकेने सेवा हस्तांतर त्वरित करून घेतले आहेत,मात्र समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये पनवेलकर विशेष करून सिडको वसाहतीतील रहिवासी अडकले आहेत.आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही, विशेष करून कळंबोलीमध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.त्याचबरोबर बाजूला पावसाळी गटारांचे काम सुरू आहे,याकरता मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे.सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने पावसाच्या पाण्याला निचरा होण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याचबरोबर लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.पथदिवे काही ठिकाणी बंद अवस्थेत आहे,त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. महापालिकेने ठिकठिकाणी ई टॉयलेट उभारलेत मात्र ते बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्यानांची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत.झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अद्यापही पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी झालेली नाही.घनकचरा व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन दिसून येत नाही. घंटागाडीमध्ये माती भरून संबंधित ठेकेदार कचऱ्याचे वजन वाढवण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मलःनिसारण वाहिन्या तुंबल्या असून सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कळंबोलीमध्ये अवजड वाहनांची पार्किंग केली जात आहे.हाईट गेज तोडून वाहने आतमध्ये येत आहेत,या संदर्भात वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने उपाययोजना होणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर महानगरातील रस्त्यांची दुरावस्था,महानगरपालिका क्षेत्रामध्ये क्रीडांगणांचा अभाव,सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था,माता बाल संगोपन केंद्र,कळंबोली येथे महानगरपालिकेचे रुग्णालय याचबरोबर आदी समस्यांबाबत प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे,याबाबत नक्कीच उपायोजना कराल असा आशावाद व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी नवनियुक्त आयुक्त यांना हे निवेदन दिले.
Post a Comment