खासदारांना सिडको प्रश्नाबाबत शिवसेनेचे साकडे! ..रामदास शेवाळे यांची श्रीरंग बारणे यांच्याबरोबर चर्चा ...लवकरच बैठक लावणार
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेकडे सेवा हस्तांतरित केल्या असल्या तरी अद्यापही सिडको संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासंदर्भात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी साकडे घातले आहे.लवकरच याबाबत व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही खासदारांनी जिल्हाप्रमुखांना दिली.
सिडकोने पनवेल परिसरामध्ये वसाहती विकसित केल्या. नोडल एजन्सी म्हणून प्राधिकरणाने अनेक प्रश्न आणि समस्यांचे निराकरण केले नाही. आठ वर्षांपूर्वी पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पायाभूत सुविधा आता पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. परंतु अद्यापही प्राधिकरणाकडे काही प्रश्न प्रलंबित असल्याने त्याची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने तिसऱ्यांदा खासदार आलेल्या श्रीरंग बारणे यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सिडको वसाहती मधील सीईटीपी प्लांट नादुरुस्त अवस्थेत आहेत. ते कालबाह्य आणि जुनाट झाले आहेत.त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यानुसार संबंधित
मलनिसा:रण केंद्र नूतनीकरण आणि दुरुस्त करूनच पनवेल महापालिकेकडे वर करण्यात यावेत असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.याशिवाय तळोजा येथील चाळ क्षेपण भूमीची क्षमता संपली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची नेमकी कुठे विल्हेवाट करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.याकरता सिडकोकडून मनपाला भूखंड देण्याची आवश्यकता आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सिडकोने आपला वाटा उचलावा याविषयी सुद्धा खासदार श्रीरंग बारणे यांचे लक्ष वेधण्यात आले.खारघर येथील सेंट्रल पार्क चे काम अपूर्ण अवस्थेत आहे. ते पूर्ण करून पूर्ण क्षमतेने हे उद्यान सुशोभित आणि विकसित करून पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे अशी मागणी करण्यात आली.याबाबत सिडकोला सूचना देण्याचे विनंती सुद्धा लोकसभा सदस्यांना करण्यात आली.
कामोठे वसाहतीमध्ये महावितरण कंपनीला सब स्टेशन बांधण्यासाठी जो भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर वीज वितरण कडे निशुल्क हस्तांतरित करण्यात यावा.नवीन पाणीपुरवठा योजनेची आखणी करून विस्तारित क्षेत्रासाठी आराखडा तयार करून त्यानुसार पाणी स्त्रोत निर्माण करण्यात यावा. याशिवाय पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रस्तावित जल कुंभाच्या कामांना त्वरित सुरुवात करावी याबाबतही साकडे घालण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आठ मीटरचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल सह सिडको वसाहती नैसर्गिक दृष्ट्या खाली राहिल्या आहेत. भविष्यात या परिसराला महापुराचा फटका बसू शकतो. यावर सिडको प्राधिकरणाने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी स्थानिक खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.लवकरच या संदर्भात सिडको व्यवस्थापकीच्या संचालकांकडे बैठक लावून हे प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याची ग्वाही खा .बारणे यांनी दिली.
Post a Comment